शक्तीप्रदर्शन करत रवि लांडगेंचा उद्या शिवसेनेत प्रवेश

0
132

पिंपरी, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी ) : भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी नेते रवि लांडगे हे उद्या सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या मंगळवार दिनांक २० ऑगस्ट रोजी, मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवि लांडगे शिवसेनेत औपचारिकरित्या सामील होणार आहे. प्रवेश सोहळ्यासाठी लांडगे यांच्यासोबत सुमारे ५०० वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार असल्याची सांगण्यात आले.

रवि लांडगे यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ते भाजपकडून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निवडीसोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्तेचा पाया रचला गेला होता. लांडगे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने आणि निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जात होते. आमदार महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाहीमुळे रवि लांडगे हे भाजप सोडून शिवसेनेत जात आहेत.
गेल्या काही वर्षांत पक्षांतर्गत राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. रवी लांडगे यांना महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे आश्वासन देऊनही शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले, असा आरोप रवी लांडगे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, रवी लांडगे यांनी भाजपला रामराम ठोकला आणि आता शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी मतदारसंघातून रवि लांडगे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे.