पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – महाराष्ट्रासह देशाला ३४४ वा श्री शंभुराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. १६ जानेवारी २०२४ रोजी किल्ले पुरंदर येथे हा सोहळा रंगणार असून या वेळी शंभू गौरव पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची पिंपरी चिंचवड शहरवासीय अनुभूती घेणार आहेत. यासाठी शहरातून हजारो शंभू प्रेमी या कार्यक्रमाला दाखल होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.
या कार्यक्रमाला शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.त्यांचे उपस्थितांना देखील मार्गदर्शन होणार आहे.
सतीश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की,शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने श्री शंभुराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान अनेक मान्यवरांना विविध क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या मध्ये क्रीडा क्षेत्रात पैलवान शुभम थोरात यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल हा सन्मान करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रात अनिल जाधव यांना रेड डायमंड पेरूची नवीन व्हरायटी शोधल्याबद्दल सन्मानीत करण्यात येणार आहे. ते काटेवाडी (ता. बारामती जि.पुणे) येथील शेतकरी आहेत.या बरोबरच संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था,जोगाईवाडी (ता. अंबाजोगाई, जि.बीड)चे अध्यक्ष अॅड. संतोष पवार यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. उद्योजकतेमध्ये वरदायिनी उद्योग समूह बावधन पुणे येथील किरण वेडे-पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे.
या कार्यक्रमाची अनुभूती घेण्यासाठी तसेच भव्य नयनरम्य सोहळा पाहण्याची संधी शहरातील नागरिकांना मिळावी, या हेतूने त्यांना देखील कार्यक्रमाला घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.