शंभरीत पदार्पण कऱणाऱ्या आईंचा मोदींनी घेतला आशिर्वाद

0
373

अहमदाबाद, दि. १८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची आज भेट घेतली. आज हिबेन या वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. हिराबा या नावानेही अनेकजण हिराबेन यांना ओळखतात. पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. मोदींनी या फोटोंना एक छान कॅप्शनही दिली आहे.

“आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे. या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून ते आईशी हसून चर्चा करत आहेत. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदींनी शेअर केलेले हे फोटो अल्पावधीत व्हायरल झाले असून पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांना सव्वापाच हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.

गांधीनगरमध्ये रस्त्याला पूज्य हिराबेन यांचे नाव –
गांधीनगरमधील एका रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या दिवशी अनोखा सन्मान केला जात आहे. त्यांच्या नावाने आता एक रस्ता ओळखला जाणार आहे. गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी बुधवारी अधिकृत निवेदनामध्ये सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन १०० वर्षांच्या होत आहेत आणि राज्याच्या राजधानीतील लोकांची मागणी आणि भावना लक्षात घेऊन, रायसन पेट्रोल पंपापासून ८० मीटर रस्त्याला ‘पूज्य हिराबा मार्ग’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

हिराबेन यांचे नाव सदैव जिवंत राहावे आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याग, तपश्चर्या, सेवा आणि कर्तव्यनिष्ठेचे धडे मिळावेत, या उद्देशाने ८० मीटर रस्त्याचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे निवेदनात पुढे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी १८ जून रोजी त्यांच्या आयुष्याच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी ही माहिती दिली.
मोदी कुटुंबाच्या वतीने प्रल्हादभाई मोदी यांनी महापूजा, यज्ञ, महाप्रसादाचे आयोजन केले आहे.