शंकर जगताप विरोधातील इच्छुकांची एकत्रीत मोर्चेबांधनी

0
293

विधानसभा निवडणुकिला प्रत्यक्षात अजून तीन महिने बाकी आहेत मात्र, चिंचवड मतदारसंघात आतापासून जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुती आणि महाआघाडी असा तीव्र संघर्ष होणार, असे दिसते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकित तिरंगी लढतीत मतविभागणी झाली आणि श्रीमती अश्विनी जगताप या विजयी झाल्या. अवघी दोन वर्षे संधी मिळाल्याने आता २०२४ साठी पुन्हा उनमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे अटोकाट प्रयत्न आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भाजपमधील बहुसंख्य माजी नगरसवेकांचाही त्यांना पाठिंबा आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार अश्विनी जगताप यांचे सख्खे दिर शंकरशेठ जगताप यांनी आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट सांगत तयारी सुरू केल्याने दिर-भावजयी असा संघर्ष उफाळून आला आहे. आता यावेळी जगताप कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार द्यावा, अशी पक्षांतर्गत मागणी आहे. एकवेळ पुन्हा आमदार अश्विनीताईंनाच संधी दिली तरी चालेल मात्र, शंकरशेठ नकोत असे उघडपणे बोलणाऱ्यांचा आवाज मोठा आहे. हा संघर्ष टीपेला पोचला असून त्यात आमदारताईंची सरशी होणार अशीही चर्चा आहे.
दरम्यान, आपल्याला पक्षांतर्गत वाढता विरोध लक्षात घेता दगाफटका नको म्हणून शंकरशेठ जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून प्रसंगी तुतारी हातात घेणार अशीही चर्चा रंगली आहे. शंकरशेठला उमेदवारी दिलीच तर आम्ही रिंगणात उतरणार, असा इशारा माजी नगरसवेक राजेंद्र जगताप यांनी दिला आहे. मतदारसंघातील सर्व इच्छुकांनी शंकरशेठच्या विरोधात मोट बांधली आहे, असे चित्र गेल्या आठवड्यात दिसले. माजी नगरसवेक आणि भाजपमधून प्रबेळ दावेदार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या शत्रृघ्न काटे यांनी १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी शंकरशेठ वगळून खासदार बारणे यांच्यासह मंचकावर आमदार अश्विनी जगताप, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसवेक चंद्रकांत नखाते, राजेंद्र जगताप, मोरेश्वर शेडगे असे सर्व ताकदिचे इच्छुक नेते एकत्र आले होते. ग.दि.मा. नाट्यगृहात भोऊसाहेब भोईर यांनी आयोजित केलेल्या समारंभातही जगताप सोडून सर्व ताकदिचे इच्छुक एकाच व्यासपीठावर आल्याने शंकरशेठ अक्षरशः एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. आपली बाजू भक्कम कऱण्यासाठी समर्थकांच्या मदतीने स्वतंत्रपणे विविध कार्यक्रमांचा सपाटा शंकरशेठ यांनी लावला आहे, मात्र त्यात भाजपचे पदाधिकारी कोणीही सहभागी होत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.