व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी भागधारकांच्या गटचर्चेस सुरूवात

0
2

पिंपरी, दि. २२ – शहरातील पाणीपातळी वाढविण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगवर भर देणे, प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन वापरावर भर देणे, सीसीटीव्हीचे जाळे वाढविणे, सरकारी योजनांचा प्रचार प्रसार अधिक प्रमाणात करणे, बेरोजगारांना लघुउद्योग प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशा विविध प्रतिक्रिया आज झालेल्या व्हिजन@५० शहर धोरण गटचर्चेमध्ये सहभागी सुमारे १४० भागधारकांनी उपस्थित राहून मांडल्या. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये झालेल्या या गटचर्चेतील भागधारकांमध्ये विविध स्वयंसेवी संस्था तसेच आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांचा समावेश होता.

व्हिजन@५० शहरी धोरण उपक्रमाअंतर्गत शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि नागरी कल्याण, तंत्रज्ञान आणि प्रशासन, शहरी पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व विषयांना केंद्रस्थानी ठेऊन गटचर्चेमध्ये सहभागींना प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीच्या आधारे उपस्थितांनी आपली मते आणि भविष्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या.

पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत २० जानेवारी ते २६ फेब्रुवारी यादरम्यान विविध विषयांवरील गटचर्चांचे (फोकस ग्रुप डिस्कशन) आयोजन आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. गटचर्चेने शहरातील विविध समस्या सोडविण्यास मदत तर मिळेलच शिवाय नागरिकांचा प्रशासनामधील सहभाग वाढून शहराच्या विकासाचे पुढील ७ वर्षांचे धोरण सर्वांच्या सहकार्याने विकसित होणार आहे. अशा नागरी सहभाग असलेल्या उपक्रमांमुळे पारदर्शकता वाढून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कायम राहण्यास मदत मिळेल.

  • मिलिंद कुलकर्णी, गटचर्चेत सहभागी भागधारक

व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या वतीने आयोजित गटचर्चेमध्ये नागरिकांनीही पुढाकार घेऊन सहभागी होणे आवश्यक आहे कारण शहराचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये त्यांचाही महत्वाचा वाटा आहे. विविध भागातील नागरिक यामध्ये सहभागी झाले तर प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या समजतील, शिवाय त्यांची मते जाणून घेण्यासही मदत मिळेल.

  • संजिवनी मुळे, संस्थापक, श्री कल्पतरू बहुउद्देशीय सामाजिक संस्था