व्हिडीओ व्हायरल करत युवतीने केला मेट्रो कारभाराचा पंचनामा

0
309

सोशल मीडियावर अनेकदा प्रवासी त्यांच्या प्रवासातील चांगले वाईट अनुभव सांगताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मेट्रोमध्ये तिकीट काढताना तिला आलेला वाईट अनुभव सांगताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. ती सेल्फी कॅमेऱ्यात तिच्याबरोबर घडलेली घटना सांगताना दिसत आहे. ती सांगते, “आता मी आहे मेट्रो स्टेशनला, पुण्यामध्ये नळ स्टॉपला.. तर मी त्यांना तिकीट मागितले तर तिकीटची किंमत होती १८ रुपये. त्यांनी मला १८ रुपयांचे तिकीट दिले मी त्यांना ५० रुपये दिले. त्यानंतर त्यांनी मला ३० रुपये परत दिले. मी त्यांना विचारले दोन रुपये द्या तर ते म्हणाले सुट्टे नाही. त्यानंतर मी म्हणाले ठिक आहे तर तुम्ही मला माझे पन्नास रुपये परत द्या आणि तुम्ही माझ्याकडून ऑनलाईल घ्या त्यावर ते म्हणाले की आधीच तिकीट काढलेले आहे तर ऑनलाईन करता येणार नाही, सुट्टे नाहीत. त्यावर मी म्हणाली हे रोज चालणार नाही. रोज रोज कसं चालणार तुम्हाला. रोज माझ्याकडून दोन रुपये घेणार असे हजारो लोक माझ्यासारखे मेट्रोमधून प्रवास करतात. दोन दोन रूपये कसे चालणार. एक काम करा माझ्याकडे १५ रुपये आहे तर हे १५ रुपये घ्या आणि तीन रुपये मला सुट द्या. मग ते म्हणाले असं कसं चालेल. हिशोब द्यावा लागतो. मग मी म्हणाले माझ्यासारखे जे लोक दोन दोन रुपये ठेवून जातात त्यांच्याकडून मॅनेज करा. त्यांनी ते नाकारलं त्यानंतर मी माझा मोबाईल काढला आणि व्हिडीओ करते आणि सगळीकडे व्हायरल करते म्हणाले तेव्हा लगेच त्यांच्याकडे दोन रुपये सुट्टे आले.”

पुढे ही तरुणी म्हणते, ” खरंच पुणे मेट्रो स्टेशन जे पाहतात त्यांना एक विनंती आहे जे लोक तिकीट काउंटरला बसतात त्यांना मार्गदर्शन करा कारण त्यांना कुठे जायचं असं विचारल्यानंतर ते नीट उत्तर सुद्धा देत नाही आणि दुसरी गोष्ट अशा सुट्ट्या पैशांचा गोंधळ करतात. एक तर तिथे चॉकलेटचे डबे ठेवा. सुट्टे पैसे नाही तर चॉकलेट घेऊन जा, तो प्रकार तरी करा. किती आणि कुठून कुठून छापणार आहात तुम्ही सामान्य माणसांकडून.. एक एक दोन रुपयांसाठी मेहनत करतात लोक”

pragati_sharanya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या तरुणीचे नाव प्रगती सांगळे आहे. ती एक व्हिडीओ क्रिएटर असून हजारो लोक तिला फॉलो करतात. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “या सर्व गोष्टींना कोण जबाबदार आहेत तेच कळत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “जो प्रामाणिकपणे ८ तास घाम गाळून काम करतो, त्यालाच एक रुपयांची किंमत कळते” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही पोरगी राव धाडसी आहे मानलं बरं का” अनेक युजर्सनी या तरुणीचे कौतुक केला आहेत.