व्हिडीओ पोस्ट करत महेश लांडगेंची अजित पवारांना आदरांजली

0
3

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्रासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक ठरली. कारण अजित पवार यांच्याबाबत अशी काही बातमी येईल याची कल्पनाही कुणाला शिवलेली नव्हती. आज बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान भाजपाचे नेते महेश लांडगे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अजित पवार तीन दिवसांपूर्वी म्हणाले होते काळाचं, नियतीचं बोलवणं आलं की जायचं. हा व्हिडीओ पोस्ट करत महेश लांडगेंनी अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे.

काय म्हटलं आहे महेश लांडगेंनी?
राजकारण म्हणजे सर्वस्व नाही.. शेवटी जनतेचं हित महत्वाचं असतं.. तुम्ही आम्ही क्षणिक आहोत, निमित्तमात्र आहोत.. अवघ्या तीन चार दिवसांपूर्वी एका भाषणात बोलताना स्व. अजितदादांनी दिलेला हा संदेश खऱ्या अर्थाने त्यांच्यातील एक अतिशय प्रगल्भ, प्रामाणिक, आणि भावनिक लोकनेत्याचे दर्शन घडवितो..!

तीन दिवसांपूर्वी भाषणात काय म्हटलं?

“मित्रांनो हे जग कायमचं राहणार आहे, तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू. काळाचं, नियतीचं बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाचं हित पाहिलं पाहिजे. राजकारण हेच काही सर्वस्व नाही. राजकारण होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे.” असं अजित पवार या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. अजित पवार यांचा हा व्हिडीओ त्यांचे विरोधक असलेल्या महेश लांडगेंनी पोस्ट केला आहे. जो व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राने कायमच एक सूज्ञ म्हणावी अशी परंपरा राखली आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या आठवणीने सगळेच गहिवरले आहेत. महेश लांडगेही त्याला अपवाद नाहीत हेच ही पोस्ट सांगते आहे.