व्यावसायिक मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण सुरू, जेष्ठ माजी नगरसेविका सिमा सावळे यांच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल

0
373

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील व्यावसायिक मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जेष्ठ माजी नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी त्याबाबत दोन महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाला एक लेखी पत्र देऊन मागणी केली होती. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांची तत्काळ दखल घेतली. शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, संस्थात्मक, वैद्यकीय मालमत्तांमधून अग्निप्रतिबंधात्मक काय उपाययोजना केल्या आहेत किंवा नाही याचा आढावा या सर्वेक्षणात अग्निशामक विभाग घेणार आहे.

चिखली, पुर्णानगर येथे सचिन हार्डवेअर या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली आणि दुकानाच्या पोटमाळ्यावर राहणाऱ्या चौधरी कुटुंबातील पाच जणांची अक्षरशः राख रांगोळी झाली. त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व वाणिज्य आस्थापनांचे फायर ऑडीट करा, अशी आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

महापालिकेच्या वतीने सर्वेक्षणाचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. त्यासाठी बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून शहरातील नेमक्या व्यावसायिक मालमत्ता किती आहेत, परवाना किती दुकानदारांकडे आहे याची माहिती संकलित होणार आहे. उपयोजनच्या एप माध्यमातून अग्निशामक यंत्रणेची उपलब्धता, मालमत्तांचे छायाचित्र, विविध परवान्यांची माहिती एकत्रीत मिळणार आहे.

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनंतर मालमत्ता सुरक्षेबाबत अग्निशामक विभागाकडून सुचना केल्या जातील. सर्वेक्षणासाठी महापालिका आधिकारी, कर्मचारी, महिला बचतगटाच्या प्रतिनिधींचे ओळखपत्र पाहून विविध परवान्यांबाबत माहिती द्यायची आहे. त्यात अन्न व औषधे परवाना, महापालविका साठा व विक्री व्यवसाय परवाना, वीज बिल, इमारतीचा बांधकाम परवाना, व्यवसाय परवाना, अग्निशामक ना हरकत दाखला आदी माहिती द्यावी लागणार आहे. संबंधीतत नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

तो प्रसंग चटका लावणारा –
पूर्णानगरच्या दुर्घटनेत जीव वाचविण्यासाठी चौधरी व त्यांच्या मुलांनी आरडाओरडा केला होता, मात्र त्यांना मदत मिळू शकली नाही. पोटमाळ्याच्या खालीच दुकानात आग लागल्याने त्यांना बाहेर जाण्यास रस्ता नव्हता. दुकानाला आग लागल्यानंतर चौधरी यांचा मोठा मुलगा भावेश हा बाहेरील नागरिकांकडे मदतीसाठी याचना करीत होता. धूर आणि आगीत खिडकीजवळ येऊन तो काहीतरी करा, शटर तोडा, आम्हाला बाहेर काढा, आम्हाला वाचवा, असे ओरडत होता. मात्र, पूर्ण दुकान आगीत वेढल्याने बाहेरील नागरिक इच्छा असूनही काहीच करू शकत नव्हते. आगीची तीव्रता अधिक असल्याने शटर तोडून आत जाण्यासाठी अग्निशामक दलाला जवळपास अर्धा तास वेळ गेला. अग्निशामक दलाचे जवान त्यांच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच चारही जण आगीत ओढले गेल्याने त्यांचा होरपळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे शहर हळहळले होते. सिमा सावळे यांनी त्याच क्षणी आयुक्तांना पत्र देत पुन्हा अशा घटना शहरात होऊ नयेत म्हणून सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.