पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – व्यावसायिक कारणावरून झालेल्या ओळखीतून महिलेला कामाच्या निमित्ताने लॉजवर नेले. तिथे गुंगीकारक औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या मुलास मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. धमकावून, जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला. तसेच महिलेची दीड लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2019, मार्च 2021 मध्ये बाणेर येथे घडला.
परीक्षित सुभाष पाटील (वय 43, रा. धायरी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने 6 जून 2022 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे सिक्युरिटी एजन्सी चालवतात. त्यातून त्यांची एकमेकांशी ओळख झाली. जुलै 2019 मध्ये आरोपीने फिर्यादीस कामाचे काहीतरी बोलायचे आहे असे सांगून फिर्यादी यांना लॉजवर नेले. काहीतरी अर्जंट काम असल्याचे सांगून परीक्षित बाहेर गेला. थोड्या वेळाने येऊन त्याने फिर्यादीस कोल्डड्रिंक्स मधून गुंगीकारक पदार्थ देऊन फिर्यादीवर बलात्कार केला.
मार्च 2021 मध्ये फिर्यादीला आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने फिर्यादीवर बलात्कार केला. फिर्यादी यांनी पुरवलेल्या सिक्युरिटीचे सुमारे दीड लाख रुपये आज देतो, उद्या देतो असे म्हणून पैसे न देता विश्वासघात केला. ‘तू कशी काम करते’ असे धमकावून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठलाग करून ‘तू आली नाही तर मी तुला घरात घुसून उचलून पळवून नेईल. तुझे पैसे देणार नाही. तुझ्या पोराला जिवंत सोडणार नाही. तुझी सुपारी देतो. माझ्या एका कॉलवर तुझा कार्यक्रम होईल. तुझ्यावर मी खोट्या केस करून तुझी बदनामी करेल’ असे सतत धमकावले.
19 मे 2022 रोजी एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला फोन केला. ‘तू परीक्षितच्या घरी कॉल का केला’ अशी धमकी देत फिर्यादीला अश्लील भाषेत बोलावून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.