व्यायाम शाळा हस्तांतरणावरून हिंजवडी ग्रामपंचायत सभेत जुंपली, ग्रामपंचायत सदस्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
778

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – हिंजवडी येथील ग्रामपंचायतच्या मासिक सभेत व्यायाम शाळा हस्तांतरणाच्या मुद्द्यावरून सभासदांमध्ये जुंपली, यावेळी एका सभासदाला 7 ते 8 जणांनी मिळून शिवीगाळ , मारहाण करत दमदाटी केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यासह 8 जणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.28) हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालय येथे घडला.

विशाल लक्ष्मण साखरे( वय 44) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ग्रामपंचायत सदस्य मयूर राजेंद्र साखरे, ओंकार रामदास मेमाणे, सुरज शिवाजी साखरे, राम नारायण साखरे, सुमित पांडुरंग साखरे, रोहित कृष्णा जांभुळकर सर्व राहणार हिंजवडी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू होती. यावेळी सभेतील अजेंड्यावर ग्रामपंचायत व्यायाम शाळा हस्तांतरणाबाबतचा मुद्दा चर्चेसाठी आला. ही व्यायाम शाळा मयूर साखरे यांच्या भाऊ चालवत आहे. तर ही व्यायाम शाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यास त्यांचा विरोध होता. यातूनच त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत तुला बघून घेतो असे धमकी दिली व ते सभेतून बाहेर निघून गेले. काही वेळाने त्यांनी त्यांच्या इतर साथिदराना सोबत घेऊन फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी मध्यस्थी करत ही भांडणे सोडवली. यावेळी आरोपीने तू बाहेर ये तुला संपवतोच अशी धमकी देली व जो मध्ये पडतोय त्यालाही बघून घेतो म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.