व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींना धावून येणारे खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल – श्रीचंद आसवानी

0
149

पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या पिंपरी मर्चंट फेडरेशनने मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एका बैठकीत जाहीर पाठिंबा दिला. व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींना धावून येणाऱ्या बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पिंपरी कॅम्प येथील उबाडो पंचायत ट्रस्टच्या बी. टी. अडवाणी सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार बारणे, पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, उबाडो पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष ‌ओमप्रकाश तथा बाबू आडवाणी तसेच हरेश बोधानी, अनिल आसवानी, श्याम मेघरानी, इंदरशेठ बजाज, सुशील बजाज यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीचंद आसवानी म्हणाले की, खासदार बारणे हे पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात. सुख-दुःखात ते साथ देतात. कोविड काळात त्यांनी व्यापाऱ्यांना खूप मदत केली. पिंपरी कॅम्पातील माथाडी कामगारांचा प्रश्न त्यांनी सोडवला.‌ व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींत ते सदैव पाठीशी असतात.‌ त्यामुळे या निवडणुकीतही बारणे यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय व्यापारी बांधवांनी घेतला आहे.

पिंपरी कॅम्पला गावठाणाचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून निवडणूक झाल्यानंतर त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे खासदार बारणे यांनी सांगितले. सिंधी बांधवांना निर्वासित सनद देण्याचा विषय लवकरच मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी कॅम्पातील व्यापारी प्रामाणिकपणे व कष्टाने काम करतात. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर एका फोनवर मी काम करतो. माझा कोणालाही त्रास नसतो, असे बारणे म्हणाले. चुकीचे काम आपण कधी केले नाही आणि चुकीच्या कामाला कधी पाठीशी घातले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व आणि आपण केलेले काम, सातत्याने ठेवलेला संपर्क या आधारे आपण मते मागत आहोत, असे बारणे म्हणाले.