व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात – जयंत पाटील

0
186

भोसरी – व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अमोल कोल्हे, सचिन अहिर, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, कैलास कदम, तुषार कामठे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशावर 210 लाख कोटीचे कर्ज आहे. देशातील श्रीमंत कंपन्यांना सवलती देऊन बँकांना तोट्यात आणण्याचे काम सरकारनं केलं आहे. भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे. जीएसटीचा विषय एवढा गहन केलाय की, चपलेपासून डोक्याच्या केसांपर्यत सगळ्या गोष्टींवर जीएसटी आहे.
देशातल्या जनतेकडून पैसे लुटण्याचे काम देशातल सरकार करत आहे, हे जनतेला सांगा, अस आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

लोकसभेच्या निवडणूका ह्या जनतेने हातात घेतलेल्या आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष फोडण्याचे पाप हे भाजपने केलं. हे मराठी माणसाला आवडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भाजपचा पराभव करायचा आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वळचणीला असलेल्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत. म्हणून त्यांचाही पराभव करायचा आहे.,असेही जयंत पाटील म्हणाले.

घराघरात तुतारी पोहोचवा

डॉ. अमोल कोल्हे यांच मागचा वेळी घड्याळ हे चिन्ह होत. त्यामुळे विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याची शक्यता जास्त आहे. घड्याळ न्याय प्रविष्ट आहे, पण मतदारांना हे लक्षात येत नाही. म्हणून घराघरात जाऊन शरद पवारांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे सांगा.