व्यवसायाच्या बहाण्याने दाम्पत्याची 37 लाखांची फसवणूक

0
289

वाकड, दि. ११ (पीसीबी) – भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याकडून 53 लाख रुपये घेतले. त्यानंतर व्यवसायातील 16 लाख रुपये नफा देऊन उर्वरित 37 लाख रुपये न देता दाम्पत्याची फसवणूक केली. ही घटना 1 ऑक्टोबर 2018 ते 14 मार्च 2019 या कालावधीत नखातेनगर, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी महिलेने रविवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र मारुती त्र्यंबके (वय 31, रा. मुकाई चौक, रावेत), चंद्रमणी लोखंडे (रा. अंबरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला भागीदारीत लिफ्ट प्रोजेक्टचा व्यवसाय करू असे आमिष दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून 38 लाख 35 हजार 50 रुपये घेतले. फिर्यादी यांचे नातेवाईक आणि मित्रांकडून घेतलेले पैसे आणि घरातील सोने असे 14 लाख 65 हजार रुपये पुन्हा आरोपींना दिले. फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपींना 53 लाख 50 रुपये दिले. आरोपींनी व्यवसायातील नफा म्हणून 16 लाख रुपये रोख स्वरूपात फिर्यादींना परत दिले. उर्वरित गुंतवलेली 37 लाख 50 रुपये रक्कम न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.