दि . २७ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणेच्या लग्नात करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे, ज्यामुळे समाजात हुंड्याच्या नव्या प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा 2023मध्ये प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोने, एक आलिशान चारचाकी गाडी आणि चांदीची भांडी भेट म्हणून दिली होती. याशिवाय, सुसगाव येथील सनीज वर्ल्डमध्ये लाखो रुपये खर्च करून शाही थाटामाटात विवाह आयोजित केला होता, ज्याची आजूबाजूच्या परिसरात खूप चर्चा झाली होती.
वैष्णवी हगवणेचं शाही लग्न
या भव्य लग्नसोहळ्यानंतर काही दिवसांनीच वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane) सासरच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. लग्नात चांदीची भांडी न दिल्याने नाराज झालेल्या तिच्या सासरच्या लोकांनी तिला अपमानास्पद बोलले. तक्रारीत असेही म्हटले आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, ज्यामुळे तिला टोकाचे पाऊल उचलावे लागले.
वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात कोट्यवधींचा खर्च केला गेला, जो आता हुंड्याचा नवा प्रकार मानला जात आहे. याचे दुष्परिणाम समाजावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्यूनर कार असा हुंडा तर घेतलाच होता. त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्चही करायला लावला. वैष्णवीच्या आणि शशांकच्या लग्नाची परिसरात खूप चर्चा झाली होती, कारण कस्पटेंनी मुलीचं लग्न पाण्यासारखा खर्च करून लावून दिलं होतं.
या लग्नासाठी आलेल्या खर्चाचे आकडे धक्कादायक आहेत. वैष्णवीच्या लग्नासाठी तब्बल दहा लाख रुपये भाडे असलेले आलिशान रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावले. लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर बावीस लाख रुपये खर्च करायला लावले. पाच हजार जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आले होते, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार याप्रमाणे पन्नास लाख जेवणावर खर्च करायला लावले. पाहुण्यांचे सत्कार, स्वागत आणि कपड्यांवरही मोठ्या प्रमाणात खर्च करायला लावला. लग्नाचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावले, त्याचे लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले. अशाप्रकारे वैष्णवीच्या लग्नात एका दिवसासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह करायचं ठरवलं तेव्हा वैष्णवीच्या माहेरच्यांनी कस्पटे यांनी हगवणे कुटुंबीयांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना हगवणे कुटुंबीयांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी वैष्णवीला समजावून तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, शशांकने त्या प्रयत्नांमध्ये खोडा घालणे सुरू केले. वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांकने फोन करून धमकावल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीचाही समावेश असल्याचे दिसून येते.