वैद्यकीय विम्याची 10 कोटींची तरतुद ‘धन्वंतरी’कडे वळवली.

0
190

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) -धन्वंतरी कक्षाकडील सन 2022-23 च्या मुळ अंदाजपत्रकात वैद्यकीय बीलांची पूर्तता करण्यासाठी पुरेशी तरतुद उपलब्ध नाही. त्यामुळे मागील तसेच चालू प्रलंबित बीलांची पूर्तता करण्यासाठी वैद्यकीय विमा या लेखाशिर्षावरील 10 कोटी रूपये धन्वंतरी योजनेतील उपचारासाठी वळविण्यात येणार आहे. त्यामुळे धन्वंतरी फंडात एकूण 28 कोटी 98 लाख रूपये जमा होणार आहेत.

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटूंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटूंबिय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना 1 सप्टेंबर 2015 पासून सुरू करण्यात आली. धन्वंतरी स्वास्थ योजनेचे महापालिका आस्थापनेवर 7 हजार 463 आणि सेवानिवृत्तीधारक 832 असे एकूण 8 हजार 295 सभासद आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कुटूंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचार्‍यांच्या अवलंबितांमध्ये करण्यात आला आहे.

या योजनेसाठी सेवेत कार्यरत असणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून दरमहा 300 रूपये इतका स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्‍यांकडून दरमहा 150 रूपये स्वहिस्सा जमा केला जातो. एकूण जमा होणार्‍या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम महापालिका धन्वंतरी निधीत जमा करत असते. या रकमेच्या मर्यादेत वार्षिक खर्च होणे अपेक्षित आहे. तथापि, योजना सुरू झाल्यापासून 1 सप्टेंबर 2015 ते आतापर्यंत प्राप्त झालेली बीले विचारात घेता दरमहा दोन ते अडीच कोटी रकमेची रूग्णालयीन खर्चाची बीले महापालिकेस प्राप्त होत आहेत. त्यामुळे वार्षिक अंदाजे 24 ते 30 कोटी रकमेची रूग्णालयीन बीले प्रतिपूर्तीसाठी धन्वंतरी कक्षाकडे प्राप्त होतात.

धन्वंतरी निधीत कर्मचारी वर्गणी व महापालिका हिस्सा यापोटी 8 ते 9 कोटी रूपये फक्त वार्षिक जमा होतात. त्यामुळे जमा कमी आणि खर्च तिप्पट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जादा प्राप्त बीलांची पूर्तता करण्यासाठी धन्वंतरी योजना निधीत रक्कम उपलब्ध राहत नाही, अशी परिस्थिती आहे. धन्वंतरी कक्षाकडील सन 2022-23 च्या मुळ अंदाजपत्रकात वैद्यकीय बीलांची पूर्तता करण्यासाठी पुरेशी तरतुद उपलब्ध नाही. त्यामुळे मागील तसेच चालू प्रलंबित बीलांची पूर्तता करण्यासाठी अंतर्गत वाढ किंवा घट करून धन्वंतरी फंडास तरतुद वर्ग करण्यात येणार आहे.

धन्वंतरी योजनेतून उपचारासाठी खर्चाकरिता 28 कोटी 98 लाख रूपयांची आवश्यकता आहे. या लेखाशिर्षावर अंदाजपत्रकात 18 कोटी 98 लाख रूपये तरतुद आहे. तर, वैद्यकीय विमा या लेखाशिर्षावर 10 कोटी रूपये तरतुद आहे. या 10 कोटीपैकी 9 कोटी 99 लाख 99 हजार रूपये धन्वंतरी उपचारासाठी वळविण्यात येणार आहे. त्यानुसार, धन्वंतरी फंडातील एकूण रक्कम 28 कोटी 98 लाख 48 हजार रूपये होणार आहे.

विमा योजनेची अद्यापही अंमलबजावणी नाही

‘धन्वंतरी स्वास्थ्य’ योजनेच्या धर्तीवर विमा योजना लागू करण्यासाठी महासभेने 22 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यता दिली होती. विमा योजना लागू करण्यासाठी मध्यस्थ के. एम. दस्तुर रिइन्शुरन्स ब्रोकर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत देश पातळीवर रिक्वेस्ट फॉर प्रपोजसह निविदा नोटीस देण्यात आली. त्यात दरपत्रकानुसार दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी यांची लघुत्तम निविदा प्राप्त झाली. स्थायी समिती सभेने 27 डिसेंबर 2019 रोजीच्या सभेत महापालिका सेवेतील तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्‍यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आणि फक्त कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी ग्रुप पर्सनल अ‍ॅक्सिडेंट स्किम ही दि न्यु इंडिया इन्शुरन्स यांची निविदा स्वीकृत करून करारनामा करण्यास मान्यता दिली. त्यानुसार 6 मार्च 2020 रोजी त्यांच्यासोबत करारनामा करण्यात आला. मात्र, अद्याप या विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.