वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम घालावा

0
285

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गेल्या काही सभांमधून भाजपवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत. त्यानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव यांनी बावनकुळेंचा वेस्ट इंडिजचा खेळाडू असं म्हटलं आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?
चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कधी घरकोंबडा तर कधी काय बोलतात. मी मागच्या वेळी काय म्हणालो आठवतंय का तुम्हाला? वेस्ट इंडिजचा प्लेअर होता कर्टली अम्ब्रोज, हे म्हणतात की व्यक्तिगत टीका, मग तुम्ही घरकोंबडा ही व्यक्तिगत टीका नाही? वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला वेस्ट इंडिजचं बोललं तर लागतं. तुम्हाला कोणी बोलायचं नाही, फडणवीसांना कोणी काही बोलायचं नाही. मग आमच्या पश्रप्रमुखांना काही बोलायचं नाही, वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम घालावा, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांच्यावर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी यावरून जाधवांना प्रत्युत्तर दिलं आहे. भास्कर जाधवांनी रंगावरून टीका केल्याने त्यांची नीच प्रवृत्ती दिसली. एका ओबीसी नेत्यावर अशा पद्धतीने टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंचा यातून ओबीसीद्वेष यातून दिसत आहे. येत्या काळात ओबीसींना याचं उत्तर उद्धव ठाकरेंना त्यांच्या संपत आलेल्या पक्षाला नक्कीच द्यावं लागेल, असं राम सातपुते म्हणाले.

दरम्यान, भास्कर जाधव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लोकांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी भास्कर जाधवांवर टीका केलीये तर काहींनी बावनकुळेंनी ठाकरेंवर केलेल्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.