वेळेवर उपचार घेतल्यास कर्करोग पूर्ण बरा होतो!”

0
325

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – “वेळेवर उपचार घेतल्यास कर्करोग पूर्ण बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य उपचार घ्यावेत!” असे आवाहन लायन्स क्लब प्रांतपाल डॉ. दिलीपसिंह मोहिते यांनी चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी, लिओ क्लब ऑफ पुणे आकुर्डी युथ आणि लोकमान्य हॉलिस्टीक कॅन्सर केअर, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आणि स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. दिलीपसिंह मोहिते बोलत होते.

लायन्सचे विभागीय अध्यक्ष सलीम शिकलगार, लोकमान्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल क्षीरसागर, लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिल भांगडिया, कोषाध्यक्ष विठ्ठल झोडगे आणि सदस्यांची सदस्यांची उपस्थिती होती. सलीम शिकलगार यांनी आपल्या मनोगतातून, “लोकमान्य हॉस्पिटल हे पिंपरी-चिंचवड परिसरातील जुने आणि विश्वासार्ह रुग्णालय आहे. त्यांच्या स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या कर्करोग तपासणी केंद्रात सर्व प्रकारच्या कर्करोगाची तपासणी आणि उपचार केले जातात म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महिलांसाठी दोन दिवसीय मोफत स्तनाच्या कर्करोगाची तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे!” अशी माहिती दिली. डॉ. विशाल क्षीरसागर यांनी कर्करोगाची लक्षणे, तपासण्या आणि औषधोपचार याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर यांनी आपले अनुभव कथन केले. अनिल भांगडिया यांनी रुग्णांची विचारपूस केली. लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी भविष्यात लोकमान्य रुग्णालयाला आर्थिक साहाय्य करून रुग्णांसाठी वेगवेगळी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. लोकमान्यचे मार्केटिंग प्रमुख सहदेव गोळे यांनी प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलन आणि गणेशपूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तुळशीची रोपे प्रदान करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुमारे सत्तर महिला रुग्णांनी शिबिरासाठी नावनोंदणी केली. वसंत गुजर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.