वेल्डिंगसाठी फिडर पिलरमधून वायर जोडताना विद्युत अपघात, एक जखमी

0
61

पुणे, १७ जुलै (पीसीबी) – वेल्डिंग करण्यासाठी जवळच्या फिडर पिलरमधून अनधिकृत वीजवापर करण्यासाठी वेल्डिंग मशीनची वायर जोडताना विद्युत अपघात झाला व यात एक जण जखमी झाल्याची घटना आकुर्डी येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी १२ च्या सुमारास घडली. या घटनेबाबत महावितरणकडून संबंधित पोलीस स्टेशन व विद्युत निरीक्षक कार्यालयास माहिती देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, भोसरी विभाग अंतर्गत आकुर्डी येथे मयूर समृद्धी फेज-२ मध्ये फाटक उभारण्याचे काम सुरु आहे. त्याच ठिकाणी महावितरणच्या उच्चदाब २२ केव्ही बजाज वीजवाहिनीचा फिडर पिलर आहे. आज सकाळी १२ वाजताच्या सुमारास फाटकाच्या कामामध्ये वेल्डिंग करण्यासाठी एका कामगाराने २२ केव्ही फिडर पिलरचा दरवाजा उघडून अनधिकृत वीजवापर करण्यासाठी वेल्डिंग मशीनची वायर जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात कामगाराला विद्युत धक्का बसल्याने तो जखमी झाला. या जखमी कामगारावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान महावितरणकडून या घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशन व विद्युत निरीक्षक कार्यालयास माहिती देण्यात आली आहे.