मुंबई, दि. १७ (पीसीबी) – महाराष्ट्रात उभारण्यात येणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याच्या हातून निसटला आणि गुजरातला गेलाय. यावरुन आता आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचं राजकारण सुरू आहे. दरम्यान, भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा आरोप केला आहे. शेलारांनी ट्विटमधून शिवसेनेला अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारला आहे.
शेलार यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवली, अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी १० टक्के लाच द्यावी लागत होती, इतका भ्रष्टाचार बोकाळला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प दीड लाख कोटींचा होता, मग इथं किती टक्के मागितले होते? १० टक्क्यांनुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतल्या रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे, जनतेसमोर सत्य यायलाच हवं.”
वेदांताचा हा मोठा प्रकल्प हातातून निसटल्याने आधीच मोठा गदारोळ सुरू आहे. त्यात आता आशिष शेलारांच्या आरोपांमुळे आता वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार दोघेही हा प्रकल्प जाण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलताना दिसत आहेत. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र याबद्दल मोदींशी संवाद साधला आहे. त्यावर मोदींनी महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.