वेदांत-फॉक्सकॉन प्रकऱणात आता आदित्य ठाकरे रस्त्यावर, जनआक्रोश आंदोलनाची घोषणा

0
212

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन हा सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला. यामुळं महाराष्ट्रातील प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. यामुळं शिवसेना नेते आदित्य ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत. यासाठी त्यांनी जनआक्रोश आंदोलनाची घोषणा केली.

पुण्यात २४ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरेंचं हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंनी या निषेध आंदोलनाची गुरुवारी घोषणा केली. आदित्य ठाकरे पुण्यात आंदोलन करणार आहेत, कारण पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथं हा प्रकल्प येणार होता. पण आता हा प्रकल्प इथून गुजरातमध्ये गेल्यानं मोठ्या प्रमाणावर पुण्यातील तरुणांचा रोजगार गेला आहे.

महाराष्ट्रात हा प्रकल्प व्हावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांनी लवकरच हा प्रकल्प तळेगाव येथे सुरू होणार होता. पुणे जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणच्या मोटार उत्पादक कंपन्यांमध्ये सेमीकंडक्टरची मायक्रोचीप व डिजिटल उत्पादनामध्ये लागणाऱ्या चीपचा अनेक दिवसापासून तुटवडा असल्याने मोटार खरेदी व विविध वस्तू खरेदीसाठी त्यांना तीन महिने, सहा महिने, वर्षभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पुण्यामध्ये हा प्रकल्प अत्यंत गरजेचा होता.