वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ बल्क ड्रग पार्क गेल्याने ८० हजार रोजगार जाणार

0
189

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना आता रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडमध्ये रोहा-मुरुड भागात बल्क ड्रग पार्क प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले.

बल्क ड्रग पार्कमुळे ८० हजार जणांना रोजगार मिळणार होता. पण आता हा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याचे घाटत आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे कारभारात लक्ष नसल्याने हे घडत आहे. अजून तरुण शांत आहेत. पण त्यांचा अंत नका पाहू नका, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

बल्क ड्रग पार्कसाठी केंद्राला आम्ही पत्र देऊन मागणी केली होती. पण तोही महाराष्ट्राबाहेर नेण्याचे घाटत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शन करत फिरत आहेत. या प्रकल्पाबाबत सरकारमधील मंत्र्यांना विचारले तर उद्योगमंत्री म्हणतील की, हा प्रकल्प आरोग्य विभागाचा आहे. आरोग्यमंत्री म्हणतील हाफकिनच्या माणसाला विचारा, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. फॉक्सकॉन प्रकल्प येणार असे खुद्द शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केले. पण नंतर दुर्लक्ष केले. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हा विषय माहिती नाही. किमान उद्योगमंत्र्यांनी उत्तरे दिली पाहिजेत. केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेला, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले …
‘बल्क ड्रग पार्क’साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. हा प्रकल्प देखील आपण रायगड आणि इतर परिसरात आणणार होतो. यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी प्रस्ताव पाठवले होते. पण आता गुजरातमधील भरुच इथं हा ‘बल्क ड्रग पार्क’ होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता.

या काळात सध्याचे मुख्यमंत्री घरोघरी जाऊन भेटी देत होते, अनेक ठिकाणी फिरत होते. पण या मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना देखील हा विषय माहिती नसेल की, हा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रासाठी उपयोगी होता त्यावर महाराष्ट्राचा पहिला हक्क होता, तो महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. हे किती खरं आणि किती खोटं याचं उत्तर मला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षित असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.