वेदांता- फॉक्सकॉनची शेवटपर्यंत खात्री नसते

0
208

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित केल्याप्रकरणी शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं. वेदांताच्या प्रकल्पाची शेवटपर्यंत खात्री नसते अशा शब्दांत पवारांनी जुनी आठवण सांगत सडेतोड भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प जो तळेगावच्या परिसरात येणार होता. या परिसरातील चाकण एमआयडीसीचा परिसर हा देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. चाकण, रांजणगाव एमआयडीसीचा परिसर हा ऑटोमोबाईलचा कॉरिडॉर करण्याची संकल्पना मी स्वतः सरकारमध्ये असताना मांडली होती.

सुदैवानं देशातील चांगल्या कंपन्या इथं आल्या आणि हा देशाचा महत्वाचा भाग झाला. त्यामुळं इथं जर प्रकल्प टाकला असता तर वेदांता कंपनीला अधिक सोयीचं झालं असतं. पण या कंपनीनं वेगळा निर्णय घेतला. पण वेदांताचं हे काही नवीन नाही, पण वेदांताचे मालक अनिल अग्रवाल यांनी असा निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, माझ्याासाठी प्रकल्प जाण्याचा प्रकार नवीन नाही.

यापूर्वी देशातील एक महत्वाचा प्रकल्प रत्नागिरीत करण्याचा निर्णय झाला होता. हा प्रकल्प वेदांताचाच होता. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध झाला आणि तो चेन्नईला हलवण्यात आला, ही जुनी गोष्ट आहे. वेदांताच्या बाबतीत ही पहिलीच गोष्ट नाही, यापूर्वीही झाली आहे. त्यामुळं वेदांताचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल का नाही, याची खात्री निदान मला तरी देता येत नाही, असं सडेतोड भाष्य शरद पवार यांनी केलं आहे.