वेदांत-फॉक्सकॉन गेला, मावळचे पुढारी झोपलेत काय ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
541

मावळ तालुका म्हणजे पुणे परगण्याचे नाक. कोकणातून घाटमाथ्यावर येतानाचे प्रवेशद्वार. सुजलाम, सुफलाम असा प्रांत. राष्ट्राच्या जडणघडणीत मावळचे योगदान तसे खूप मोठे आहे, पण आमच्या कपाळकरंट्या राजकारण्यांना त्याचे भान नाही. पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराच्या उद्योग, व्यापाराच जी काही भरभराट आहे त्यात मावळचा सिंहाचा वाटा आहे, पण राज्यकर्ते ते विसरतात. मावळाणे संरक्षण खात्यासाठी जागेचे योगदान दिले. मावळाणे एमआयडीसी साठी थोडेथिडके नाही तर तब्बल पाच-सहा हजार हक्टर क्षेत्र उदार अंतःकरणाने बहाल केले. टाटा कंपनीच्या वलवण, ठोकळवाडी, शिरोंता, सोमवडी, भुशी अशा पाच धरणांसाठी भूमिपुत्रांनी जमीन दिली. आज १०० वर्षांत टाटा कंपनीने त्यावर खूप कमावले, पण मावळच्या भूमिपुत्रांना काय मिळाले हा संशोधनाचा विषय आहे. किती मावळकर बेरोजगारांना टाटा कंपनीने नोकऱ्या दिल्या हे एकदा तपासायला पाहिजे. राज्य सरकारने मावळातील काळ्याभोर पिकाऊ जमिनी घेऊनच पवना, आंद्रा, वडिवळे ही तीन धरणे बांधली म्हणून पिंपरी चिंचवड शहर एक देशातील अव्वल औद्योगिक शहर म्हणून नावारुपाला आले.

मावळातीलच तळेगाव पंचक्रोशित पाच टप्प्यांत एमआयडीसी उभारण्यासाठी मोठे क्षेत्र संपादीत करण्यात आले. किरकोळ कंत्राटदारी वगळता नियमानुसार किती कंपन्यांनी भुमिपुत्रांच्या पोटापाण्याची सोय केली याचाही लेखाजोखा मांडला पाहिजे. आज सहा हजार हेक्टरवची चाकणची कारखानदारी मावळच्या पाण्यावर तगली. पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसीसाठीने किमान दीड हजार कंपन्यासुध्दा पवनेच्या पाण्यावर चालतात. रेल्वे, पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाने दोन महानगरे जोडली. त्यातून हजारो कोटींनी अर्थकारण बदलले, पण मावळच्या वाट्याला काय आले, हा प्रश्न मावळच्या पुढाऱ्यांनी विचारला पाहिजे. दुर्दैव असे की, मावळ भरभरुन देत असताना त्या तुलनेत मावळकरांची रेवडी कवडीवर बोळवण होते. हे सगळे पुराण सांगण्याचे कारण म्हणजे मावळचे लाखो बेरोजगार ज्या प्रकल्पाकडे डोळे लावून बसले होते तो वेदांत-फॉक्सकॉन भाजपाच्या नेत्यांनी रात्रीतून गुजराथला नेला. दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षात किमान दोन लाख रोजगार उपलब्ध करून देणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प केवळ राजकीय स्वार्थापोटी गुजराथला गेला. जमीन, वीज, पाणी, दळणवळण, तांत्रिक मनुष्यबळ, हे गुंतवणूक करण्यापूर्वीचे सर्व मुद्दे विचारात घेऊन कंपनीने तळेगावची जागा निश्चित केली होती. पुणे, नवी मुंबईचे विमानतळ, रेल्वे, जेएनपीटी ची कनेक्टिव्हीटी कंपनीला महत्वाची वाटले, पण मोदी-शहा यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजराथ विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी वेदांत-फॉक्सकॉनचे लॉलिपॉप पाहिजे होते. त्यातूनच प्रकल्प गेला. मावळ परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या, दहा पिढ्यांचे भविष्य उज्वल कऱणाऱ्या या प्रकल्पाचा राजकीय स्वार्थापोटी बळी दिला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मावळकर अजून किती अन्याय सहन करणार –
हातातोंडाशी आलेला वेदांत-फॉक्सकॉनचा घास गेला म्हणून मुंबईत आदित्य ठाकरे यांनी रान पेटवले. शिवसेना, राष्ट्रवादीने काही फुटकळ आंदोलने केली. मनसेचे राज ठाकरे इभ्रत राखण्यासाठी म्हणून तोंडदेखले बोलले. खरे तर, ज्या मावळकरांच्या वाट्याचे घबाड गुजराथने पळवले त्या विरोधात मावळ तालुक्यातील जनतेने पेटून उठायला हवे होते. आमदार सुनिल शेळके यांनी नावाला एक आंदोलन केले आणि पुढे सगळे शांत झाले. मावळची अस्मिता जागविण्याचा गरज आहे, पण निधड्या छातीचे छत्रपतींचे तमाम मावळे झोपी गेलेत. प्रश्न राजकारणाचा नाही, तर मावळच्या भवितव्याचा आहे. यापूर्वी डाऊचा प्रकल्प गेला, पण तो परिसराची बरबादी करणारा होता म्हणून घालवावा लागला. हिरानंदानी ग्रुपचा २५०० मेगावॉटचा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प प्रदुषणमुळे गेला. घातक रसायन प्रकल्प असल्याने त्यावेळचा तो विरोध रास्त होता. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मावळातील भाजपाने या विषयावर एक शब्द काढला नाही, हे दुर्दैव. इतर वेळी भूमिपुत्रांसाठी पत्र देणारे भाजपा नेते आता मूग गिळून बसले. मोदी-शाह यांच्या मुळे त्यांची कोंडी झाली असेल, पण निवडणुकित याचा फटका बसू शकतो. महाराष्ट्रातील मराठी तरुणांची बाजू मांडणाऱ्या राज ठाकरे यांची मनसे सुध्दा मावळात तोंड उघङायला तयार नाही. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे मुंबईत या विषयावर बोलले, आता तेच शनिवारी म्हणजे २३ सप्टेंबरला मावळात आंदोलन छेडणार आहेत. ज्या मावळच्या भूमिवर अन्याय झाला तिथले पुढारी काय करतात हा प्रश्न आहे. पवना जलवाहिनीला विरोध करण्यासाठी एक्सप्रेस वे वर बारा वर्षांपूर्वी सर्वपक्षांनी मिळून मोठे आंदोलन केले होते. गोळीबार झाला आणि त्यात निष्पाप तीन शेतकऱ्यांचा बळी गेला हा एतिहास आहे. डान्सबारच्या विरोधात मावळ करांनी जोरदार विरोध केला म्हणून तालुका व्याभिचारापासून सुरक्षित राहिला. याचा अर्थ मनात आणले तर शक्य आहे. भाजपाने २५-३० वर्षे इथे निर्विवाद सत्ता गाजवली. लोणावळा, तळेगाव मध्ये भाजपाने वर्चस्व होते. आमदार शेळके यांनी उठाव केला आता त्यांच्या मागे सर्व पक्षांनी केवळ तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून वज्रमूठ केली पाहिजे. वेदांत-फॉक्सकॉन नाय तर मत नाय, अशी ठोस भूमिका घेतली पाहिजे. कुठेतरी कठोर झाले पाहिजे. मावळच्या वाट्याचे मावळला मिळाले पाहिजे इतकेच.