वेटरला मारहाण केल्याने हॉटेल मालकाने केला मित्राचा खून

0
75

तळेगाव, दि. 27 (पीसीबी) : गावातील मित्राने हॉटेलमध्ये येऊन वेटरला मारहाण केली. या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून हॉटेल मालकाने मित्राचा कोयत्याने वार करत खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास इंदोरी बायपास येथील हॉटेल जय मल्हार समोर घडली.

प्रसाद उर्फ किरण अशोक पवार (वय 27, रा. कानेवाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसाद याचा मित्र अभिषेक अशोक येवले (वय 31, रा. कानेवाडी, ता. मावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. अक्षय दत्तात्रय येवले (वय 30, रा. कुंडमळा, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरी बायपास येथे असलेल्या हॉटेल जय मल्हार येथे मंगळवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास प्रसाद उर्फ किरण पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले यांनी जय मल्हार हॉटेलमधील वेटरला मारहाण केली होती. प्रसाद, अभिषेक आणि हॉटेल मालक अक्षय हे मित्र आहेत. तर अक्षय आणि अभिजीत हे चुलत चुलत भाऊ आहेत.

मारहाण झाल्याची माहिती वेटरने हॉटेल मालक अक्षय येवले यास दिली. हॉटेल मालक अक्षय याने त्याचे मित्र प्रसाद पवार व अभिषेक येवले यांना आपण एकाच गावचे आहोत. तरीही तू माझ्या लोकांना येऊन मारतो. भांडण करू नको असे सांगितले होते. त्यावरून फोनवरच दोघांच्यात शिवीगाळ झाली होती.

प्रसाद व अभिषेक हॉटेल मधून निघून गेले. रात्री साडे अकरा वाजता प्रसाद व अभिषेक हे कोयता घेऊन हॉटेल जवळ पुन्हा आले. त्यावेळी हॉटेल मालक अक्षय येवले हे हॉटेल बंद करून त्यांची वाट बघत थांबला होता. हॉटेल मालक अक्षय येवले व त्यांच्यात वादावादी होऊन आरोपी अक्ष
येवले याने त्यांच्या हातातील कोयता घेऊन दोघांनाही गंभीर जखमी केले.

तळेगाव एमआयडीसी पोलीस गस्त घालत असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली पोलिसांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे व तेथून पवना हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यातील जखमी प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याचा मृत्यू झाला. तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अक्षय येवले याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.