रत्नागिरी, दि. 30 (पीसीबी) : रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथील वृध्दाची दोघा संशयितांनी ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांनी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून तसेच पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना शनिवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साई प्रसाद पुरुषोत्तम गावडे (वय ६५) राहणार साई छाया सदन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे, रत्नागिरी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांपैकी एकाने फिर्यादी यांना फोन करुन मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादींना तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याची भिती देखील घातली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रारीकरता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा करत दुसऱ्या संशयिताने फिर्यादीशी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत व्हॉटसअॅपवरुन हेमराज कोळी नावाचा पोलीस अधिकारी असल्याची सांगत संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही संशयितांनी संगनमताने फिर्यादीला तुमकच्या बँक खात्यातून २ कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भिती घालून त्यांच्या बँक खात्यातून ६१ लाख १९ हजार ८० रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८, (४), ३१९ (२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.