खेड, दि. २७ (पीसीबी) – वृद्ध वडिलांचे पालनपोषण न करता त्यांना घरातून हाकलून दिले. याप्रकरणी दोन मुले आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 मे रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील वराळे गावात घडली.
निवृत्ती बाबुराव बुट्टे (वय 92, रा. वराळे, ता. खेड. सध्या रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 26) फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब निवृत्ती बुट्टे, बाळासाहेब याची पत्नी, संतोष निवृत्ती बुट्टे, संतोष याची पत्नी (सर्व रा. वराळे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वय 92 वर्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. त्यांचे पालन पोषण करणे हे त्यांची मुले आणि सुना यांचे कर्तव्य असताना त्यांनी फिर्यादी यांचे पालन पोषण न करता त्यांना घरातून हाकलून दिले. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.