वृद्ध महिलेची बोरमाळ हिसकावली

0
644

नवी सांगवी, दि. २९ (पीसीबी) – घराजवळ काम करत असलेल्या महिलेजवळ तूप विकण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने त्याच्या आईला देखील महिलेकडे असलेल्या दागिन्यांसारखे दागिने करायचे असल्याची बतावणी करून 80 हजारांची बोरमाळ हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी विनायक नगर, नवी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या राहत्या इमारतीचा जिना झाडून घेत होत्या. इमारतीच्या खाली बोळीत झाडून घेत असताना 25 ते 30 वर्ष वयोगटातील एकजण फिर्यादीजवळ आला. तूप घेता का असे त्याने म्हटले. त्यावर फिर्यादी यांनी नकार दिला. त्यांनतर आरोपीने तुमच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ दाखवा. मला माझ्या आईला अशीच बोरमाळ करायची आहे, असे म्हटले. त्यावर फिर्यादी यांनी पदर बाजूला करून बोरमाळ दाखवली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील 80 हजारांची बोरमाळ हिसका मारून तोडून नेली. फिर्यादी यांना घाबरल्याने ओरडता येईना. त्यामुळे त्यांनी काही अंतर आरोपीचा पाठलाग केला. मात्र आरोपी त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.