वृद्ध आईला मारहाण करत घराबाहेर हाकलले; मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल

0
608

खेड, दि. २९ (पीसीबी) – वृद्ध आईला रक्तदाबाचा त्रास असताना तिला मारहाण करून घराबाहेर काढले. मुलाला समजवण्यासाठी आलेल्या आई, बहिण, मावशी यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी मुलगा आणि सुनेच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक पालन पोषण व कल्याण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर रोजी दुपारी खेड तालुक्यातील येलवाडी येथे घडला.

निखील गुलाब लोखंडे (वय ३२), त्याची पत्नी (दोघे रा. येलवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी निखील याच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या मुलाची असताना मुलगा आरोपी निखील याने फिर्यादीस मागील तीन महिन्यांपूर्वी घरातून बाहेर काढले. त्यांनतर १ ऑक्टोबर रोजी फिर्यादी, त्यांची मुलगी, बहिण आणि बहिणीच्या मुली आरोपी निखील याला समजवण्यासाठी आल्या. त्यावेळी निखील आणि त्याच्या पत्नीने फिर्यादी आणि त्यांच्या मुलगी व बहिणीला शिवीगाळ केली. निखील याने पुन्हा आईला घराबाहेर काढून काठीने हातावर, पायावर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.