वीस वर्षांपूर्वी दरोडा घातलेला आरोपी जेरबंद

0
331

पिंपरी, दि.: १२(पीसीबी)- मागील वीस वर्षांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे. पिंपरी मध्ये गुन्हा करून नाव व वास्तव्य लपवून हा आरोपी पुणे शहरातील कोंढवा परिसरात राहत होता.फजल उर्फ फैजूर रेहमान शौकतअली शेख (वय 37, रा. खराळवाडी, पिंपरी. सध्या रा. कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2003 मध्ये आरोपी फजल याने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा घातला होता. दरोड्याचा गुन्हा करून फजल पळून गेला. तो अस्तित्व व ओळख लपवून, नाव बदलून फिरत असल्याने पोलिसांना तो सापडला नाही. दरम्यान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष मोहीम आरंभली. त्यामध्ये गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाला फजलबाबत माहिती मिळाली. फजल हा सध्या कोंढवा येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कोंढवा येथे सापळा लावला. वीस वर्षानंतर देखील फजलच्या मनात पोलिसांविषयी भीती होती. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वीस वर्षांपूर्वी दरोड्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले. पुढील कारवाईसाठी त्याला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.