वीर हेंजा नाईक क्रिकेट चषक २०२४ गुरव इलेव्हन संघाने पटकावला

0
151

दि १५ एप्रिल (पीसीबी ) – क्षत्रिय कोमरपंत समाज संघ आयोजित एक दिवसीय वीर हेंजा नाईक क्रिकेट चषक २०२४ गुरव इलेव्हन संघाने अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे रविवार, दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी पटकावला. याप्रसंगी क्षत्रिय कोमरपंत समाज संघाचे अध्यक्ष गिरीश नाईक, उपाध्यक्ष राहुल नाईक, सचिव दीपक नाईक, सहसचिव संतोष होसाळकर, खजिनदार विकास नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कोस्टल फ्रेंड सर्कल – भोसरी या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. रोहन नागवेकर यांना मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच विवेक गुरव (गुरव इलेव्हन), सुजय राणे (धनंजय सावंत ११), विक्रम नाईक (कारवार कझिन्स), राजेश नाईक (झिंकरकर झिंकले), सुरेंद्र नाईक (कोस्टल फ्रेंड सर्कल – भोसरी), सचिन नाईक (केकेज् वॉरिअर्स), सागर नाईक (सागर इलेव्हन), सतीश पडवळकर (जय हनुमान) या सर्व कर्णधारांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दुपारच्या रणरणत्या उन्हात सुमारे दोन हजार प्रेक्षकांनी स्पर्धेतील शेवटच्या चेंडूपर्यंत हजेरी लावून या स्पर्धेचा आनंद लुटला. शिवानंद पवार यांनी अस्सल कोकणी भाषेतून स्पर्धेचे रसभरित समालोचन करून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केला.

पुरस्कार प्रदान सत्रात क्षत्रिय कोमरपंत समाज संघाचे अध्यक्ष गिरीश नाईक यांनी आपल्या मनोगतातून, “पिंपरी – चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या कारवार येथील मूळ रहिवासीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वीर हेंजा नाईक क्रिकेट चषक २०२४ या स्पर्धेमुळे खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याची चुणूक नागरिकांना अनुभवता आली. त्यांच्या भावी कारकिर्दीत या कौशल्याचा निश्चितच उपयोग होईल!” असे गौरवोद्गार काढले. क्षत्रिय कोमरपंत समाज संघाचे सचिव दीपक नाईक यांनी, “कारवार शहरातील क्रांतिकारक वीर हेंजा नाईक यांनी आपल्या शौर्याने इ. स. १७९९ पर्यंत हैदर अली आणि टिपू सुलतान यांना उत्तर कन्नडच्या भूमीवर पाऊल ठेवू दिले नाही. आपल्या अतुलनीय पराक्रमाने नाईक यांनी दक्षिणेत मोठा प्रभाव निर्माण केला होता. लॉर्ड वेलस्लीने टिपू सुलतानाला मारल्यावर वीर हेंजा नाईक यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते; परंतु नाईक यांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर ब्रिटिशांना कारवारच्या पूर्व समुद्रात शिरकाव करू दिला नाही. शेवटी ब्रिटिशांनी कपटाने १८०१ मध्ये या महान क्रांतिकारकाचा बळी घेतला. कारवारच्या भूमीसाठी बलिदान देणाऱ्या या महान क्रांतिकारकाच्या स्मरणार्थ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते!” अशी माहिती दिली. क्षत्रिय कोमरपंत समाज संघ आणि सचिन नाईक यांच्या विशेष परिश्रमामुळे स्पर्धा यशस्वी झाली.