मुंबई, दि. १७ (पीसीबी) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. वीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
एका आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला. वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं. वीर सावरकरांचा हा अपमान सहन केला जाणार नाही. कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काय म्हणाले राहुल गांधी?
सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींवर परखड भाषेत टीका केली होती.











































