पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – मोशी, चिखली, चऱ्होलीसह पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या वीज वितरण संदर्भातील समस्या तातडीने सोडवा. आतापर्यंत निवेदने, मागणी असा पाठपुरावा केला. मात्र, आश्वासने देवून हात झटकाणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे परिसरात फिरकू देणार नाही, असा इशारा चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने दिला आहे.
सततच्या विजेच्या समस्या बाबत चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन आक्रमक भूमिका घेतली. चिखली-मोशी परिसरातील मागील काही दिवसांपासून विजेच्या समस्यांबाबत सोसायटी फेडरेशने आमदार महेश लांडगे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आमदार लांडगे यांच्या सूचनेवरून त्वरित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भोसले यांनी चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी येथील महावितरणच्या कार्यालयात फेडरेशनच्या पदाधिकऱ्यांचा बरोबर चर्चा केली. मीटिंगला महावितरणचे कार्यकारी अभियंता भोसले साहेब, कनिष्ठ अभियंता रमेश सूळ, फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, उपाध्यक्ष योगेश चोधरी, सचिन टिपले, गणेश जाधव, प्रितम बनकर व परिसरातील सोसायटी सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये परिसरातील सोसायटी सदस्य व फेडरेशन पदाधिकारी यांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रोज खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे आमच्या सोसायट्यांमध्ये असणाऱ्या लिफ्टसाठी हजारो रुपयांचे डिझेल लागते. तसेच, अचानक व वारंवार लाईट जाण्याने आमच्या लिफ्ट बंद पडतात व काहीवेळा डी.जी. चालू होत नाही. त्यामुळे लिफ्टमध्ये काही सदस्य अडकतात, असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, महावितरण प्रशासनाकडून उदासीनता दाखवली जाते. त्यामुळे प्रशासनाने वीज समस्या तात्काळ सोडवावी, अन्यथा सोसायटीधारक सदस्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता भोसले यांनी मागील दोन दिवस विजेच्या समस्यांमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कधी-कधी फॉल्ट शोधण्यास अडचण येते. त्यामुळे काम करण्यास विलंब होतो. यापुढील काळात फॉल्ट शोधून त्यावर त्वरित काम करण्याची प्रशासनाची भूमिका राहील, असे आश्वासन दिले आहे.
आमच्या चिखली-मोशी परिसरातील विजेची समस्या लवकर मार्गी लावली नाही तर खूप मोठे आंदोलन करण्यात येईल, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना गोट्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येईल व या सर्व अधिकाऱ्यांना गोट्या वाटण्यात येतील व महावितरणच्या अधिकाऱ्यांना परिसरात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिला.