वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा

0
273

पिंपरी, दि. 4(पीसीबी)-वीजबिल अपडेट करण्याचा बहाणा करून वृद्ध व्यक्तीला मोबाईल मध्ये क्विक सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्याद्वारे बँक खात्याची गोपिनीय माहिती चोरून वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून ९० हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी दुपारी चिंचवड येथे घडली.

वी कृष्णमूर्ती (वय ७३, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी कृष्णमूर्ती यांना फोन करून फोनवरील व्यक्ती एमएसईबी कार्यालयातून बोलत असल्याचा बहाणा केला. कृष्णमूर्ती यांचे वीजबिल अपडेट करून देण्याचा बहाणा करून त्यांना क्वीक सपोर्ट नावाचे अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे कृष्णमूर्ती आणि त्यांच्या पत्नी यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून ९० हजार ५१० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.