वीजबिलांपोटी दरमहा ६ हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊंस’

0
327

धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे, दि. १२ जुलै (पीसीबी) – महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये लघुदाब वर्गवारीतील दरमहा ६ हजार ५०० ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेले धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व ग्राहकांना दरमहा सुमारे ४८ लाख ७५ हजारांच्या बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेसचा तसेच १.२५ टक्के विलंब आकाराचा नाहक दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांचा धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीमद्वारे (ईसीएस) भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत सुमारे ९८ हजार ५०० ते ९९ हजार वीजग्राहक दरमहा धनादेशाद्वारे सुमारे ११९ कोटी ५० लाख रुपयांच्या वीजबिल भरणा करीत आहे. यातील सुमारे ६ हजार ते ६ हजार ५०० ग्राहकांनी दिलेले साधारणतः ४ कोटी ६५ लाख रुपयांचे धनादेश विविध कारणांमुळे अनादरीत होत आहे. यामध्ये पुणे शहरातील ४ हजार ४५०, पिंपरी चिंचवड- १०५० आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांतील सुमारे एक हजार ग्राहकांचे धनादेश दरमहा अनादरीत होत असल्याचे दिसून येत आहे.

अनादरीत धनादेशासाठी चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधीत खात्यात रक्कम नसणे आदी कारणे दिसून येत आहेत. अनादरीत धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम व विलंब आकार लावण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व १.२५ टक्के विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

याउलट पुणे परिमंडलामध्ये राज्यात सर्वाधिक दरमहा २० लाख लघुदाब ग्राहकांकडून तब्बल ६०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ‘ऑनलाइन’द्वारे सोयीने व सुरक्षितपणे केला जात आहे. तसेच थेट बँकेद्वारे दरमहा वीजबिल भरणा करण्यासाठी ‘ईसीएस’ची सोय उपलब्ध आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची मर्यादा यापूर्वी १० हजार रुपयांपेक्षा अधिक होती. ही मर्यादा आता किमान ५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार या ग्राहकांच्या ५ हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

घरबसल्या एका क्लिकवर ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास एक टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड वगळता ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरणा पध्दतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी वीजबिलांचा धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.