ऑनलाइन पेमेंटसाठी अनोळखी ॲप डाऊनलोड करणे टाळा
पुणे, दि. ८ (पीसीबी): वीजपुरवठा खंडित करण्याची भिती दाखवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवलेल्या विशिष्ट लिंकद्वारेच किंवा अनोळखी ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन रक्कम भरण्याच्या संदेशाकडे नागरिकांनी साफ दुर्लक्ष करावे. त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. नागरिकांनी वीजबिल भरण्याबाबत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’वरील तोंडी/लेखी संदेश किंवा कॉलवर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असा बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश किंवा पत्र पाठविण्यात येत आहेत. मोबाईल कॉल देखील करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ज्यांचा वीजबिलांशी काहीही संबंध नाही अशा नागरिकांना किंवा वीजबिल पूर्वीच भरलेले आहे अशा वीजग्राहकांना देखील हा बनावट संदेश पाठविण्यात येत आहे.
सावधगिरी न बाळगता नागरिकांनी या बनावट संदेशांना किंवा कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर फक्त ‘ऑनलाइन’द्वारेच वीजबिल भरण्यास सांगणे, त्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटची लिंक पाठविणे किंवा सॉफ्टवेअर (जे मोबाईल किंवा संगणक हॅक करतात) डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. नागरिकांनी अशा बनावट संदेशांना प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून संबंधित बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्यात येत आहे. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनच्या १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजबिलांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी वीजग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व www.mahadiscom.in ही वेबसाईट उपलब्ध आहे. महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व ‘व्हॉटस् ॲप’ मेसे पाठविण्यात येत नाही. तर ज्या ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे केवळ त्याच ग्राहकांना वीजसेवेबाबत माहिती देणारे ‘एसएमएस’ संगणकीय प्रणालीद्वारे पाठविण्यात येतात. या संदेशाचे सेंडर आयडी (Sender ID) हे VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असे आहेत. तसेच या अधिकृत संदेशाद्वारे वीजग्राहकांना कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही. बँकेचा ओटीपी शेअर करण्याबाबत किंवा कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल म्हणले, वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत संदेश आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नये. तसेच बिलाची रक्कम भरण्यासाठी वैयक्तिक क्रमांकावरून पाठविण्यात आलेली ऑनलाइन लिंक ओपन करू नये व कोणतेही सॉफ्टवेअर/ ॲप डाऊनलोड करू नये.