विहित कर्म करणे म्हणजे ईश्वरपूजा होय!” – दत्तात्रेय होसबाले

0
297

पिंपरी,दिनांक : १८(पीसीबी) “प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म निष्ठेने करणे म्हणजे ईश्वरपूजा होय!” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी केले. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील जनजाती भित्तीं समूहशिल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात होसबाले बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानाजी जाधव, पुणे विभाग संघचालक संभाजी गवारी, संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख रमेश पापाजी, मुकुंद कुलकर्णी, सनदी लेखापाल महेश्वर मराठे, डॉ. शकुंतला बन्सल, डॉ. नीता मोहिते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी मुक्त संवाद साधून होसबाले यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. शिक्षिकांनी येथील भटक्या विमुक्त जनजातींमधील विद्यार्थ्यांना आमच्यामध्ये आई जाणवते, ही हृद्य जाणीव मनाला सुखावणारी आहे, असे सांगितले; तर यापूर्वी एका आयटी कंपनीत नोकरी केली, तेथे भरघोस वेतन होते; परंतु आपल्या शिक्षणाचा खरा उपयोग समाजातील वंचित, उपेक्षित मुलांना घडविण्यासाठी होतो आहे, हा अनुभव मनाला समाधान देणारा आहे. येथील विद्यार्थी बहुभाषिक असल्यामुळे त्यांना शिकवताना आम्हीसुद्धा भाषिकदृष्ट्या संपन्न होत आहोत, असे शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आले. सकाळी लवकर उठणे, रोज नवीन गोष्टी शिकायला आणि नवनवीन वस्तू बनवायला खूप आवडते, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना संबोधित करताना दत्तात्रेय होसबाले पुढे म्हणाले की, “अतिप्राचीन भारतीय विद्यापीठांमध्ये ज्याप्रकारे कलाकौशल्यांवर आधारित शिक्षणपद्धती होत्या, त्यांचे अनुकरण गुरुकुलम् येथे होते आहे, ही बाब मनाला खूप आनंद देणारी आहे.

वैज्ञानिकांचे प्रयोग, चित्रकारांची चित्रसाधना, अध्यापकांचे शिकवणे या सर्व गोष्टी म्हणजे पारमार्थिक कर्म आहेत. आपल्या प्रत्येकाला नेमून दिलेले कर्म अर्थात काम निष्ठेने करणे म्हणजे ईश्वरपूजा आहे. सुदैवाने नवीन केंद्रीय शैक्षणिक धोरण पारंपरिक कलाकौशल्यांवर भर देणारे आहे.‌ प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा समाजाचा सक्रिय सहभाग घेणे जास्त श्रेयस्कर आहे. शाळा, मित्र, स्वाध्याय आणि समाज अशा चार टप्प्यांवर माणूस विद्यार्थी बनून आयुष्यभर शिकत असतो!”

कार्यक्रमापूर्वी होसबाले यांनी क्रांतितीर्थ येथील चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय तसेच पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथील वैविध्यपूर्ण प्रकल्प याविषयी माहिती जाणून घेतली. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून भारतीय परंपरेनुसार सुमारे बावीस कलाकौशल्यांवर आधारित शिक्षणपद्धती गुरुकुलम् येथे शिकवली जाते, अशी माहिती दिली. यावेळी मान्यवरांना विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली; तसेच मल्लखांब प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमादरम्यान संग्राम गरड या विद्यार्थ्यांने दत्तात्रेय होसबाले यांचे सुरेख रेखाचित्र चितारून त्यांना प्रदान केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच समिती संचालित शाळांमधील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ॲड. सतिश गोरडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तसेच आभार मानले.