पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेने यंत्रणेसह सुविधा उपलब्ध करून दिल्याने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकडे नागरिकांचा अधिक कल दिसून येत असून गणेश विसर्जनाच्या पुढील दिवसांसाठी देखील महापालिकेने अधिक मनुष्यबळासह सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जनसंवाद सभेत नागरिकांनी केली. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन स्थळी वैयक्तिक लक्ष देऊन कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली.आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत ७१ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १६, ९, ५, ५, ४, ८, १८ आणि ६ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता सतीश इंगळे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारींचा ओघ सुरूच!
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या, जुन्या ड्रेनेज वाहिन्या अरुंद असल्याने मलवहनास अडथळा निर्माण होऊन पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे, त्यासाठी नव्याने मोठ्या ड्रेनेज वाहिन्या टाकाव्यात, अनेक ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या सतत तुंबत आहेत त्या दुरुस्त कराव्यात, नागरिकांनी रस्त्यावर आणि इतरत्र गाड्या उभ्या केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून संबंधित ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र दर्शवणारे फलक लावावेत, घंटागाड्यांमधून कचरा वाहताना कचरा रस्त्यावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी, रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने असे अतिक्रमण काढण्यात यावे, नव्याने पदपथ तयार करण्यात यावे, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, अशा सूचना वजा तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.