विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली चिरडल्याने तीन चिमुकल्या बालकांचा मृत्यू

0
105

दि. १८ (पीसीबी) – धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आनंदाच्या वातावरणात एक हृदयद्रावक घटना घडली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडल्याने तीन चिमुकल्या बालकांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या घटनेने गावात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

आज, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू असताना चितोड गावातील ही घटना साऱ्या राज्याला हादरवून टाकणारी ठरली. एकलव्य मित्र मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला.

अपघातात परी बागूल (वय १३), शेरा सोनवणे (वय ६), आणि लड्डू पावरा (वय ३) या तीन निष्पाप बालकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गायत्री पवार (वय २५), विद्या जाधव (वय २७), अजय सोमवंशी (वय २३), उज्वला मालचे (वय २३), ललिता मोरे (वय १६), आणि रिया सोनवणे (वय १७) हे सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहिती नुसार, ट्रॅक्टरचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रॅक्टर थांबलेला असताना, चालकाने अचानक त्यावर ताबा मिळवून वाहन सुरू केले, ज्यामुळे रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या बालकांवर वाहन गेलं. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी धावपळ करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, आणि ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने चितोड गावात गणेश विसर्जनाच्या उत्साहावर विरजण पडलं आहे. गावात शोक आणि तणावाचं वातावरण आहे.