विसर्जन घाट तयारीचे शत्रुघ्न काटे यांच्याकडून आढावा; सुरक्षा व सुविधा यासाठी महत्त्वाच्या सूचना

0
3

दि. २५ (पीसीबी) : सोमवार दि. 25/08/2025 रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी नदीवरील विसर्जन घाटांची पाहणी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न काटे यांनी केली. या पाहणीस आरोग्य विभाग, स्थापत्य विभागाचे तसेच विद्युत विभाग अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

श्री.शत्रुघ्न काटे यांनी गणेश भक्तांच्या सुरक्षिततेसाठी सर्वंकष उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यामध्ये घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निगराणी ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे बसविणे, प्रत्येक विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी गणपती आरती करण्याची व्यवस्था करणे,घाटावर आवश्यक अशी विद्युत दिवे लावणे,गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदाची रंगरंगोटी करून स्वच्छ व नीटनेटके करणे,अत्यावश्यक सेवेसाठी 24 तास एक रुग्णवाहिकेची व्यवस्था, सुरक्षारक्षक नेमणे तसेच विसर्जन घाटावर नियमितपणे एक बचाव पथकाची नेमणूक करणे यांसारख्या उपायांचा विशेषतः उल्लेख करण्यात आला.

याशिवाय स्वच्छता,प्रकाश व्यवस्था,गर्दी नियंत्रण, आरोग्यविषयक सुविधा आणि पोलीस बंदोबस्त यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,असेही निर्देश देण्यात आले.

यासंदर्भात लेखी निवेदन प्रभाग अधिकाऱ्याला देण्यात आले असून,विसर्जन घाटांवरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देऊन गणेश भक्तांना कोणत्याही अडचणीशिवाय विसर्जन करता यावे यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.