विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बहाद्दूर पोलिसांचा सत्कार

0
278

पिंपरी,दि. ७ (पीसीबी) – विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती विभाग पुणे पश्चिम यांच्या वतीने दहशतवादी संघटनेच्या विरोधात कर्तव्य बजावणाऱ्या बहाद्दूर पोलिसांचा विशेष सत्कार वीर बाजी पासलकर सभागृह, सिंहगड रस्ता, पुणे येथे रविवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, ॲड. मृणालिनी पडवळ, तुषार कुलकर्णी, दिनेश लाड, अतुल सराफ, निखील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. ‘अल सूफा’ या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी महंमद युनूस, महंमद साकी, महंमद इम्रान, महंमद युसूफ खान यांना कोथरूड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण, अमोल नजन, मंगेश शेळके, बालारफी शेख यांनी पकडले आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन ए आय) यांच्या तपासाला गती मिळाली. त्या कर्तव्यतत्पर पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांचा उचित सन्मान करावा, त्यांना बढती द्यावी तसेच प्रत्येकी दहा लाख रुपयांचे बक्षीस द्यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

विश्व हिंदू परिषद, पुणे पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मातृशक्ती अभ्यासवर्गाच्या उद्घाटन प्रसंगी प्रांतमंत्री प्रा. संजय मुरदाळे यांनी उपस्थितांना विश्व हिंदू परिषदेच्या साठ वर्षांच्या कार्यकाळातील कार्यपद्धती, आंदोलने, सेवाकार्याची व्याप्ती याविषयी विस्तृत माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात मातृशक्ती प्रांत प्रमुख ॲड. मृणालिनी पडवळ यांनी लव्ह जिहाद रोखण्यासाठीच्या उपाययोजना, कुटुंब प्रबोधन सेवाकार्य, धर्मांतरण याविषयी माहिती दिली. यावेळी संस्कारवर्ग, सत्संग याविषयी प्रात्यक्षिकांतून प्रबोधन करण्यात आले.

समारोप सत्रामध्ये बोलताना ॲड. सतिश गोरडे म्हणाले की, “हा कार्यक्रमाचा समारोप असला तरी आपण आता प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात पर्दापण करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकून मी काय काम करायचे त्याचा मनाशी निश्चय करावा. त्या पुढच्या पावलात मी प्रवास करेन, भेटी घेऊन माहिती सांगेन, मुले – मुलींना एकत्र करेन, संस्कारवर्ग सुरू करण्यासाठी सहकार्य करेन, अशा एक एक पावलांनी आपले यश साध्य होणार आहे. सांघिक निर्णय आणि नित्य बैठका यांमधून एकी वाढेल, नवीन कार्यकर्ते तयार होतील!” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या संयोजनात ईशानी खिरे, चारुता कडूरकर, शोभा गोडबोले, श्रुती दरेकर, प्रतिभा क्षीरसागर, इंद्रायणी एकबोटे, तमन्ना पांडे, अंकिता तोडकर, अनिकेत जमदाडे यांनी सहकार्य केले. प्रिया रसाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रतिभा देवी यांनी आभार मानले.