विशाखापट्टणम येथून आणलेला 210 किलो गांजा चाकण येथे जप्त

0
340

चाकण, दि. ६ (पीसीबी) – विशाखापट्टणम आणलेला 210 किलो गांजा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण येथे पकडला. यात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गांजा तस्कर पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जात असताना पोलिसांनी तिघांना अटक केली.

गणेश कैलास चव्हाण (वय 25, रा. पाटेठाण, राहू, ता. दौंड), विकास विलास चव्हाण (वय 20, रा. चिंचोलवाडी, गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड), संजय रामदास पवार (वय 27, रा. खेडले झुंगे, ता. निफाड, जि. नाशिक), गणेश महेश जगनाडे (रा. भालसिंगवाडी, ता. खेड), एक महिला, सचिन गणपत आवळे अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.

भालसिंगवाडी येथे गांजा तस्कर गांजासह येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सप्ला लाऊन संशयित वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर कार घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने चालत्या गाडीची चावी काढून गाडी बंद केली. दरम्यान गाडी रस्त्याच्या खाली पलटी झाली. त्यावेळी गाडीत एक पोलीस कर्मचारी होते. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता त्यात गांजाचे 12 मोठे पुडे, 40 लहान पुडे आढळले. हा सर्व माल आरोपींनी विशाखापट्टणम येथील अण्णा नावाच्या व्यक्तीकडून विकत आणला होता. आरोपींनी 15 दिवसांपूर्वी देखील 120 किलो गांजा विक्रीसाठी आणला होता. आरोपी गणेश चव्हाण, विकास चव्हाण आणि संजय पवार यांनी गणेश जगनाडे याची गाडी घेऊन एक महिला आणि सचिन आवळे यांच्या सांगण्यावरून हा गांजा आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपींकडून 52 लाख 72 हजार 800 रुपये किमतीचा 210 किलो 912 ग्राम गांजा, 60 हजारांचे चार मोबाईल फोन, पाच लाख 50 हजार रुपये किमतीची गाडी असा एकूण 59 लाख दोन हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.