विवाह सोहळ्यात भटजींनी मंगलाष्टकांऐवजी सर्वांना दिलेली मतदान करण्याची शपथ…

0
86

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विवाह सोहळ्यात भटजींनी मंगलाष्टकांऐवजी सर्वांना दिलेली मतदान करण्याची शपथ…वधू-वरांनी लग्नाचे फेरे घेण्यापूर्वी हातात धरलेला मतदान जनजागृतीचा फ्लेक्स आणि अक्षतां टाकण्यापूर्वी उपस्थित हजारो व-हाडी मंडळींनी घेतलेली मतदान करण्याची शपथ…असे विवाह सोहळ्यातील आगळे-वेगळे दृष्य काल पहावयास मिळाले..
काळेवाडी येथील थोपटे लाॅन्स मंगल कार्यालयात काल शुभम गोरे आणि प्रणिता सोनके यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये भटजी विद्याधर कुलकर्णी यांनी विवाहविधी चालू होण्यापुर्वी मतदान शपथेचे वाचन केले, यावेळी विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या हजारो जणांनी “आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून, लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त आणि तसेच शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म,जात, वंश,समाज किंवा भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि नंतरच विवाहसोहळ्यास सुरूवात झाली.

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, नोडल पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे यांनी या मतदान जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

  नवविवाहीत वधूवरांनी देखील भेटीस आलेल्या सर्व नातेवाईक,पाहुणे आणि उपस्थितांना येणा-या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.