विवाहितेचा छळ करत हुंड्याची मागणी

0
476

तळेगाव दाभाडे, दि. १९ (पीसीबी) – विवाहितेचा गर्भपात करण्यासाठी सासरच्या लोकांनी तिच्यावर जादूटोणा करून जेवणात उदी टाकली. मंतरलेले लिंबू, तत्सम वस्तू ठेऊन विवाहितेच्या मनात जीवाची भीती निर्माण केली. हुंड्यावरून तिचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 18) फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 19 नोव्हेंबर 2020 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधीत भोसरी परिसरात घडली. विवाहितेने माहेरी आल्यानंतर याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला आमच्या मनासारखे लग्न झाले नाही, आमचा मानपान झाला नाही. अपेक्षे प्रमाणे दागिने दिले नाहीत. लग्न आवडले नाही म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. दरम्यान फिर्यादी गर्भवती असताना डोकेदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी दिली. तसेच गर्भपात करण्यासाठी जादूटोणा करून जेवणात उदी टाकली. बेडरूममध्ये ठिकठिकाणी मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेऊन फिर्यादीच्या मनात जीवाची भीती निर्माण केली. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत खाजगी व्यक्तीकडून मोबाईलचे सीडीआर काढून त्यातील नंबरवर सासरच्या लोकांनी फोन केले आणि त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. दिराने फिर्यादीसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीला नांदवण्यासाठी माहेरच्यांकडून चार तोळे सोने हुंड्याची मागणी केली. हुंडा न दिल्याने शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.