विवाहसोहळ्यात भाजप आमदारावर शाईफेक

0
494

सोलापूर, दि. १४ (पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यातील पिंपरीत राज्याचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांवर समता दलाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. त्यावरून राजकारण पेटलेलं असतानाच आता सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही शाईफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार देशमुख सोलापुरातील एका विवाहसोहळ्यात हजेरी लावण्यासाठी आले होते, त्यावेळी हा राडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे शहरातील एका विवाहसोहळ्यात आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आंदोलकांना वेळीच रोखल्यानं आंदोलकांनी फेकलेली शाई आमदार देशमुख यांच्या चेहऱ्यावर पडली नाही. त्यानंतर आंदोलकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केल्यानंतर विवाहस्थळी मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांची धरपकड करत त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळं घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. विवाहसोहळा व्यवस्थित पार पडल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख हे सुरक्षितरित्या पुढच्या कार्यक्रमास रवाना झाले.

भाजप नेत्यांनी महापुरुषांचा केलेल्या अपमानामुळे राज्यभर विविध मार्गांनी संताप व्यक्त केला जातो आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सोमवारी पुणे शहर बंद ठेवण्यात आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर शाईफेक कऱण्यात आली. १७ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाआघाडीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आता त्यात सोलापूरच्या घटनेची भर पडली आहे.