विलास लांडे, भाऊसाहेब भोईर थेट शरद पवारांच्या भेटीला

0
165

पिंपरी, दि. 15 (पीसीबी) : पिंपरी चिंचवडचे माजी महापौर विलास लांडे तसेच जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेत आले आहेत. भोसरी मतदारसंघात अजित गव्हाणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब तसेच चिंचवडमधून भोईर यांना महाआघाडीकडून संधी मिळावी यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात आले.

पुण्यात शरद पवार यांच्या भेटीला अनेक नेते आज दाखल होत आहेत. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला आल्याचे दिसून आले, गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने शरद पवारांची भेट घेत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती, त्यावेळी तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विलास लांडे यांच्यासोबतच भाजप नेते पृथ्वीराज जाचक शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात या भेटी सुरू आहेत. त्याचबरोबर आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉ अमोल बेनके देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

विलास लांडेंची भेटीवर प्रतिक्रिया
विलास लांडे यावेळी भेटीबाबत बोलताना म्हणाले, लपून छपून मी कधी भेटलो नाही. शरद पवारासोबत आम्ही कायम आहे, साहेब आमचे दैवत आहे, ते सर्वसामन्याचा नेता आहेत. शिरूर, पिंपरीमधील उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी आलो आहे. आम्हाला अनेक जागा मिळतील. मी साहेबांसोबत आहे, लोकसभा निवडणुकीपासून सोबत आहे. अजित दादांनी लोकसभेला दिलेला उमेदवार पटलेला नव्हता. 18-19 तारखेला जागा वाटप शरद पवार जाहीर करणार आहेत. भोसरी, खेड, मावळ, पुणे या ठिकाणी प्रचार करणार आहे. अजित दादाशी वैयक्तिक संबंध आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.