विलास लांडेंना विधान परिषदेचे अजितदादांचे आश्वासन

0
268
  • भोसरीच्या राजकारणातील रंगत वाढणार
    पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजितदादांचा हात सोडून थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने रंगत वाढली आहे. दरम्यान, गव्हाणे यांचे गॉडफादर असलेले माजी आमदार विलासशेठ लांडे यांना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांत संधी देण्याचे आश्वासन अजितदादांनी दिल्याने ते तिथेच कायम राहिले, असे समजते.
    पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात मोठी उलाथापालाथ सुरू आहे. गव्हाणे यांच्यासह २८ दिग्गज माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मिळून काल शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. भोसरी विधानसभेसाठी भाजपचे आमदार महेश लंडगे यांच्या विरोधात गव्हाणे हेच महाआघाडीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. सुरवातीला लांडगे यांच्यासाठी एकतर्फी वाटणारा हा सामना आता अतिशय रंगतदार असणार आहे.
    अजित गव्हाणे यांचे काका म्हणून विलासशेठ लांडे हेसुध्दा त्यांच्या बरोबर असतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. लांडे यांची भूमिका अत्यंत महत्वाची समजली जाते. आज अजितदादा यांच्याबरोबर पक्षातील माजी नगरसेवकांची एक बैठक पुणे सर्किटहाऊसवर पार पडली. अजितदादांच्या आश्वासनामुळे त्यावेळी लांडे हे जातीने हजर होते. पुढची दिशा २१ जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित मेळाव्यात ठरणार आहे.
    विलासशेठ लांडे म्हणाले, विधान परिषदेवर नियुक्तीसाठी अजितदादांकडे मागणी केली, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भाजपमध्ये ४४ वर्षांच्या अमित गोरखे यांच्या सारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी मिळते, इथे आम्ही ३०-३५ वर्षे लढतोय. आता पुन्हा महापालिका जिंकायची तर विधान परिषद मिळायला पाहिजे, असे वाटते.

परिषदेसाठी बहलसुध्दा तीव्र इच्छुक –
माजी महापौर योगेश बहल हेसुध्दा विधान परिषदेसाठी तीव्र इच्छुक आहेत, पीसीबी प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, मी सात टर्म नगरसेवक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी आम्ही आतापर्यंत मोठे योगदान दिले. भाजप सारखा पक्ष अमित गोरखे यांना आणि त्यापूर्वी उमा खापरे यांनी विधान परिषद देतो. अमर साबळे यांना थेट राज्यसभा मिळते. सचिन पटवर्धन यांना लोकलेखा समिती अध्यक्षपद तर सदाशिव खाडे यांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष केले जाते. इथे राष्ट्रवादीत महापौर पदाच्या पुढे काही मिळाले नाही. पिंपरी राखीव नसता तर मी आमदार झालो असतो, अजित दादांनी किमान आता विधान परिषदेसाठी विचार केला पाहिजे.
दरम्यान, भोसरीत मतदारसंघात अजित गव्हाणे यांच्यामुळे नजिकच्या काळात आता भाजपमधून आणखी मोठा कार्यकर्त्यांचा समुदाय साहेबांच्या राष्ट्रवादीकडे येणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या कार्यपध्दतीमुळे ३० नगरसेवक नाराज आहेत. पुन्हा लांडगे हेच उमेदवार असल्याने आगामी काळात महापालिकेला आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची खात्री पटल्याने ते सर्वजण गव्हाणे यांच्यामागे ठामपणे उभे राहण्यास तयार आहेत. दिघी, मोशी, चऱ्होली, चिखली, निगडी, शाहुनगरसह माजी नगरसेवकांनी आता भाजपला धक्का द्यायचे ठरवल्याने खळबळ आहे. महाआघाडीची ताकद दुप्पट झाल्याने आमदार लांडगे यांचे धाबे दणानले आहे.