विरोधी पक्षातील नेत्यांवरच कारवाई का? भाजपावर कारवाई का नाही? – छगन भुजबळ

0
222

मुंबई,दि. ०५(पीसीबी) -सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून देशभरातील विविध राजकीय नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील कोणत्या पक्षातील किती नेत्यांविरोधात ईडीकडून कारवाई केली जात आहे, याची यादीच छगन भुजबळांनी वाचून दाखवली. या यादीत एकही भारतीय जनता पार्टीचा नेता नाही, ही बाब अधोरेखित करत छगन भुजबळांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. ते शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी केलेल्या भाषणात भुजबळ म्हणाले की, सध्या देशात एकाही भाजपा नेत्यावर ईडीकडून कारवाई केली नाही. धुतल्या तांदळासारखे राज्यकर्ते पाहायचे असतील तर भाजपाकडे पाहायला हवं. कारण काहीजण स्वत:च सांगतात आम्ही दिल्लीला गेलो, तेथून गुवाहाटीला गेलो आणि सुटलो. ईडीच्या कचाट्यातून मुक्त झाल्यानंतर तेच पुन्हा म्हणतात की, या तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतात. अरे हा कसला दांभिकपणा आहे? स्वतंत्रपणे काम करत असतील तर मग विरोधी पक्षातील नेत्यांवरच कारवाई का होते? भाजपावर कारवाई का होत नाही? असे सवालही छगन भुजबळांनी उपस्थित केले आहेत.

भुजबळ पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील नेता जेव्हा भाजपात जातो, तेव्हा तो ताबडतोब शुद्ध कसा होतो? ती काय लाँड्री आहे का? वॉशिंग मशीनमध्ये टाकलं की पांढराशुभ्र व्हायला. राजकारणाची लढाई तुम्ही राजकारणासारखी मैदानात लढा, शिखंडीसारखे तपास यंत्रणांना पुढे करू नका. हिसाब-किताब हमसे न पूछ अब, ऐ जिन्दगी! तूने सितम नहीं गिने, तो हम ने भी ज़ख्म नहीं गिने…, अशी शायरी करत छगन भुजबळांनी टोलेबाजी केली आहे.

“ईडीने कारवाई केल्यास लवकर जामीन मिळत नाही, हा कायदा आहे, त्यामुळेच ईडीकडून कारवाई केली जाते. अनिल देशमुखांना ईडीचा जामीन मिळाला, पण आता त्यांना सीबीआयचा जामीन मिळत नाहीये. संजय राऊत आणि नवाब मलिकांवरही काय आरोप आहेत? ज्यामुळे त्यांच्यावर ईडीकडून कारवाई केली जात आहे. पण तेही लवकरच बाहेर येतील, कारण अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवार कधीही एकटं सोडत नाहीत” असंही भुजबळ म्हणाले.