विरोधी नेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवारसुध्दा भाजपच्या वाटेवर

0
344

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षबदलाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं असून महाविकास आघाडीतील अनेक नेतेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. येत्या काळात राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपा किंवा भाजपा संलग्न पक्षात सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. दरम्यान, देशमुख यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ असून आगामी लोकसभा-विधानसभा काळात विरोधी आघाडी पूर्णतः मोडीत काढण्याची भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे.

“मागच्या दहा वर्षांत जे जे कोणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपा किंवा भाजपा संलग्नित होऊन राजकारण करण्याचं ठरवलं आहे. येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपामध्ये आणि महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही”, असा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेत्यांचा ट्रेंड कायम राहील
“सुरुवातीच्या काळात २०१४ साली एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते, ते भाजपात आले. काही कालावधीसाठी अजित दादा विरोधी पक्षनेते होते. तेही महायुतीत आले. ही श्रृंखला पुढे चालेल”, असं संकेतही त्यांनी दिले. तसंच, विरोधी पक्षनेत्यांचा ट्रेंड यापुढेही सुरु राहणार असल्याचं ते म्हणाले. आता वडेट्टीवर आणि दानवे हेसुध्दा त्याच पंक्तीत जाऊन बसणार का याचीच आता प्रतिक्षा आहे.

दरम्यान, सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत. आशिष देशमुखांनी केलेल्या दाव्यानुसार विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेही महायुतीत सामिल होतात का, हे पाहावं लागणार आहे.

अशोक चव्हाणांबाबतचा दावा ठरला होता खरा
महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये हजेरी लावणारा एक मोठा नेता लवकरच भाजपात सामील होणार, असा दावा आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अशोक चव्हाण भाजपावासी झाले. आशिष देशमुखांचा दावा खरा ठरल्याने आता विरोधी पक्षनेत्याबाबत त्यांनी केलेलं विधानही खरं ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.