सातारा, दि. १४ऑगस्ट (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे या महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. मात्र ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊनही विरोधात काम करतील, निवडणुकीनंतर त्यांची नावे या योजनेतून वगळली जातील, असे वक्तव्य साताऱ्यातील कोरेगावचे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात केले.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठ्या संख्येने युवती व महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या नोंदणीच्या आधारे सरकार मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असताना आमदार शिंदे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजेनवरून बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांना थेट इशाराच दिला. निवडणुकीनंतर डिसेंबरमध्ये या योजनेसाठी तपासणी समितीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेतून तुमची नावे वगळण्यात येतील, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार शिंदे यांनी केले.