विमान कोसळून १८ ठार

0
106

विदेश, २४ जुलै (पीसीबी) – नेपाळच्या काठमांडू विमानतळावर विमान कोसळल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात एकूण १९ प्रवाशी होते अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, हे विमान सौर्य एअरलाईन्सचं असून आज सकाळी हे विमान काठमांडूवरून पोखरा येथे जाताना हा अपघात घडला.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोर्या एअरलाईन्सच्या 9N-AME (CRJ 200) या विमानाने आज सकाळी काठमांडू येथून पोखरा जाण्यासाठी उड्डाण घेतले. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान अचानक खाली कोसळले. स्थानिकांना आगीचे लोट दिसल्यानंतर त्यांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तसेच बचावकार्य सुरू करण्यात आले. नेपाळच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या विमानाचा पायलट जिवंत असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे काठमांडू विमानतळावरची विमान वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक विमाने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच विमानतळ प्रशासनाकडून या अपघाताची चौकशी करण्यासाठी पथकदेखील तयार करण्यात आल्यी माहिती आहे.

या घटनेनंतर आता काठमांडू विमानतळावर विमान कोसळल्याचा थरारक व्हिडीओ पुढे आला आहे. या व्हिडीओत विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेच पलटी घेतल्याचं दिसून येत आहे.